औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात घडले. या अपघातात तीनजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.अजय संजय बेडवाल (वय २४ वर्षे, रा.जामनेर, जि.जळगाव), माणिक शंकर तुपे (वय ५५ वर्षे, रा. बाभूळगाव बुद्रुक) व संजय तरटे (वय ३५ वर्षे, रा. लायगाव) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर केशवसिंग राजाराम झोनवाल (वय ३७ वर्षे, रा. लाडकवाडी) व नानाभाऊ जनार्दन तुपे (वय ४० वर्षे) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संजय तरटे हे आपल्या मित्रासोबत दुचाकी (क्रमांक एम. एच. २०/सी.एक्स.३३९७) वरून सांगवी बायपासवरून लायगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या हायवा ट्रक (क्र.एम. एच. २१ /एक्स.६३२२) ने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात संजय तरटे हे जागीच ठार झाले तर त्यांचे मित्र केशवसिंह झोनवाल गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळतात जमादार केदारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.
दुसरी अपघाताची घटना शिल्लेगावजवळ घडली. अजय बेडवाल हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होते. ते जळगाव येथून औरंगाबादकडे बुलेटवरून येत असताना रात्री आठच्या सुमारास समोरून येणार्या अज्ञात वाहनाने त्यांच्या बुलेटला जोराची धडक दिली. त्यात बेडवाल ठार झाले. या अपघाताचीनोंद शिल्लेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघाताची तिसरी घटना वैजापूर तालुक्यातील वाघाला फाट्याजवळ घडली. हा अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत माणिक तुपे हे जागीच ठार झाले, तर नानासाहेब तुपे हे गंभीर जखमी झाले आहेत. नानासाहेब तुपे यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही शिऊर बंगला येथून गारजकडे दुचाकीवरून जात होते. त्यांना समोरून आलेल्या भरधाव वाहनाने धडक दिली.